घोटी / नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर गुटखा, पानमसाला, तंबाखुजन्य पदार्थ तसेच अंमली पदार्थ व अवैध मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस ठाणे निहाय त्वरित कारवाई करण्यात येत आहे. अशातच घोटी पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती...
त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक श्रद्धा गंधास यांच्या पथकाने घोटी टोलनाका परिसरात सापळा रचून नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारे आयशर वाहन (क्रमांक एमपी ०४ जीए ८८३०) हे अडवून तपासणी केली असता सदर वाहनात कमला पसंद पान मसाला व काळ्या रंगाच्या सुगंधित तंबाखूच्या ११८ गोण्या आणि ६४ लाख २६ हजार २०० रुपये व आयशर वाहन असे एकूण ७४ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
या कारवाईत आयशर चालक मनीष नारायण प्रसाद शर्मा (वय ३६ रा.नेहरूनगर, इंदोर, मध्यप्रदेश) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास घोटी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास करत आहेत.
दरम्यान, ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे घोटी पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक श्रद्धा गंधास उपनिरीक्षक संजय कवडे, पोउनि गांगोडे, हवालदार शेळके, झाल्टे, शिंदे, दोंदे यांच्यासह आदींनी केली.


